वंदनीय बच्चु भाऊ कडू
आमच्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज जे वंदनीय आहेत. तसेच मी आमदार बच्चू भाऊंचा उल्लेख देखील वंदनीय करतो.
एकदा सोशिअल मीडियावरून एकाने मला सल्ला दिला. बच्चू भाऊंना वंदनीय म्हणून त्यांचे उदात्तीकरण करू नका. मी त्यांना तेव्हा सविस्तर उत्तर दिले नव्हते पण आज मात्र तो प्रसंग आणि मी पाहिलेले ते दृष्य जशाला तसे मांडतो.
११ एप्रिल च्या शेतकरी आसूड यात्रेसाठी शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि त्याच दिवशी तेथील एमआयटी कॉलेज मध्ये सकाळी भाऊंचा विद्यार्थ्यांशी संवाद होणार होता. मी आणि माझा मित्र अमित या बैठकीसाठी व नियोजनासाठी अगोदरच्या दिवशीच पुण्यात पोहचलो होतो. बच्चू भाऊ रात्री मुक्कामी येणार होते. आम्ही वाट पहात होतो. मुंबई वरून पुण्यात पोहचण्यासाठी भाऊंना रात्रीचे १ वाजले. विश्राम गृहावर पोहचताच भाऊ म्हणाले ‘झोपा आता, सकाळी लवकर चर्चा करू’.
विश्राम गृहाच्या तीन इमारतीत ३ खोल्या आरक्षित होत्या एका खोलीत मी, अमित वानखेडे व त्याचा एक मित्र, दुसऱ्या एका खोलीत भाऊंचे स्वीयसहाय्यक गौरव जाधव, विध्यार्थी आघाडीचे प्रमुख ऍड.मनोज टेकाडे, ऍड.अजय तापकीर. तर तिसऱ्या एका खोलीत बच्चू भाऊ व प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे रामदास काका खोत होते. आम्ही आमच्या खोलीत गेलो डोळेही लागले न लागले तर दरवाजा वाजला, दोघे दिव्यांग बांधव खोलीत आले. औरंगाबाद वरून ते भाऊंच्या भेटीला आले होते. पुन्हा तासाभरात अजून दोघे आले. आमची झोप मोड झाली होती. आम्ही थोडं नाक मुरडलंच होतं.
मी सकाळी ५ वाजताच अंघोळ करून भाऊंच्या खोलीकडे गेलो. दरवाजा उघडाच होता… दृष्य पाहून आपोआप नकळत डोळे पाणावले. मी स्तब्ध उभा होतो…. दोन बेड वर चार दिव्यांग भगिनी गाढ झोपल्या होत्या, रामदास काका सोफ्यावर तर बच्चू भाऊ खाली झोपले होते…खाली अंथरून नाही अंगावर एक शाल पांघरलेली…! मी तेथून परतलो. माझ्या खोलीत परतलो काहीच सुचत नव्हते, सारखा एकच विचार हे कसं शक्य आहे..? आम्ही आमच्या खोलीत बेड सोडला नाही जसे काही आम्ही आमच्या खोलीचे मालक, रात्री झोप मोड झाल्याने त्या दिव्यांग बांधवां बद्दल मनात नाखुशी.
आमच्या खोलीत दिव्यांग बांधव खाली झोपले होते. माणसाच्या जगण्याचा अर्थ कसा घ्यावा हे त्या प्रसंगातून शिकायला मिळाला. अगदी सरपंच पदा पासून आमदार, खासदार यांचा असणारा रुबाब, थाट आपण पाहिलेलाच आहे. आणि याच व्यवस्थेतील बच्चू भाऊंचे आचार आणि विचारा सोबत जगणे त्यांच्या ‘जगा वेगळे’ असण्याची साक्ष देतात. अनेक प्रसंग आहेत. ज्यातून मला बच्चू भाऊंच्या उत्तुंग नेतृत्वाची, अभाळमायेची प्रचिती आली.
त्या दिवशी पुण्यात सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद होती. श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार बांधव वाट पहात होते. आणि विश्रामगृहावर बच्चू भाऊ शेकडो दिव्यांग बांधवांशी संवाद साधत होते. कोणीही भाऊंना सोडण्यास तयार नव्हते शेवटी ४ वाजले मी भाऊंना म्हटले “भाऊ, पत्रकार वाट पाहताहेत, पत्रकार परिषदे सुद्धा महत्वाची आहे”.
भाऊंनी सांगितले ‘तुम्ही जा, पत्रकार परिषदेला’ मी गेलो... पत्रकार बांधवाना दिलगिरी व्यक्त करून भाऊंना का उशीर होत आहे हे सांगितले. मग मी आसूड यात्रे विषयी माहिती दिली गेली २० वर्ष मी पत्रकार म्हणून अनेकांच्या पत्रकार परिषदेला गेलो होतो. पत्रकार परिषदेत नेत्यांच्या आजू बाजूला राहून बातमीत येण्याची कार्यकर्त्यांची धडपड मी जवळून पाहिलेली आहे. ५ वाजता बच्चू भाऊ,रघुनाथ दादा पाटील, कालिदास आपेट पत्रकार परिषदेला आले. भाऊंनी सांगितले ‘आसूड यात्रेच्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात प्रमोदराव यांनी माहिती दिलेलीच असेल.
हा होता मी अनुभवलेला ‘माझ्या आयुष्यातील सर्वोच्य सन्मान’. पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांना बाहेर थांबायला सांगणारे नेते सुद्धा आम्ही पाहिले आहेत. म्हणून या एक ना एनेक मी अनुभवलेल्या प्रसंगातून बच्चू भाऊ माझ्या साठी माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी वंदनीय ठरतात.
प्रमोद कुदळे
महाराष्ट्र संपर्क प्रमुख
Comments
Post a Comment