शिवाजी भाऊ गाडे

जय प्रहार मित्रांनो,
बरेच दिवस झाले मी सोशल नेटवर्किंग या माध्यमाचा कमी प्रमाणात वापर करतोय आणि आता तर पुर्वी पेक्षा अधिक म्हणजे आणखी काही काळासाठी अलिप्त राहावे असे वाटत आहे. त्याचे कारण जरा व्यक्तिगत पातळीवर असल्याने मी ते खाजगीतच ठेवू इच्छित आहे.

आज सकाळपासून कामात व्यस्त असल्याने कुणाला बोलण्याच्याही स्थितीत नव्हतो. त्यात व्हाट्सअॅप आणि फेसबुकवर अक्षरशः मॅसेजेसचा पाऊस पडला असल्याने मेमरी पुर्ण भरल्याचा संदेश वारंवार येत होता. तेव्हा बाहेर पाऊस आणि मोबाईलमध्ये सुद्धा पाऊस पाहुन आता तर कंटाळा आला होता. म्हणून मी फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि ब्लॉग हे डिलीट करण्या आगोदर त्यातील नोटीफिकेशन चाळत असताना फेसबुकवर तेवढ्यात नोटीफिकेशन बेलवर एक मेसेज आला. बघतो तर त्यात एक आनंदाची बातमी. खरंतर ती मी विसरायला नव्हती पाहिजे ती म्हणजे माझ्या ह्रदयस्थानी आणि प्रेरणास्थानी असणारे व्यक्तीमत्व म्हणजे श्री. शिवाजी भाऊ गाडे यांचा आज वाढदिवस... ज्यांच्यामुळे मला प्रहार संघटना आणि त्यांच्या संबंधीत असलेले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे भरभरून मिळालेले प्रेम विसरता येणार नाही. कामाच्या व्यस्ततेमुळे जरा उशीरा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. त्याबद्दल क्षमस्व.

तेव्हा शिवाजी भाऊ गाडे प्रथम आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!!

या पावनघडीस... 
आसमंत तोफांनी हादरवुन सोडावं 
तुतारी-चौघडा ढोलताशांच्या गजरात 
स्वराज्याच हे आसमंत निनादुन टाकावं; 
रयतेत शाही हत्तीवरुन मिठाई वाटावी... 
संघर्षरुपी जिवनातील या नविन स्वारीत 
पुनश्चः विजयी व्हावं 
हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना... 
आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो 
आपण झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा, 
इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा. 
मागे वळून पहायला विसरू नका 
कारण कुणीतरी या दिवशी अंत:करणापासून
तुमच्या यशाची कामना करत असेल. 
प्रत्येक वाढदिवसागणिक 
तुमच्या यशाचं आभाळ अधिकधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा 
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
अणि एकंदरीत तुमचे आयुष्यच 
एक अनमोल आदर्श बनावे !

कोण्या अनामिक लेखकाने लिहिलेल्या या वरील शुभेच्छा संदेशाने शिवाजी गाडे साहेबांचे व्यक्तीमत्व त्यात अगदीच आधोरेखित होते. कारण मला माहित असलेले गाडे साहेब आजच्या नवतरूणांसाठी एक प्रेरणास्थानी असणारे आणि प्रेरणादायी प्रकाश देणारे व्यक्तीमत्व आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या सहवासात रमणारे... किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणारे... प्रत्येक गड किल्ल्यांवर वृक्षारोपण असो वा एखाद्या रक्तदान शिबिरात स्वतः जातीने हजर राहणारे...स्वतःच्या अल्पशा पगारातही दरवर्षी अपंगांसाठी स्वखर्चाने शिवदुर्ग गडाच्या सहली आयोजित करणारे... प्रहार जनशक्ती पक्षाचे महत्त्वपूर्ण संघटक व प्रहार अपंग क्रांती आंदोलन औरंगाबादचे प्रमुख जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भाऊ गाडे औरंगाबादकरांना मिळालेले एक निडर, परखड, ध्येयवादी व्यक्तीमत्व. कळसुबाई शिखर सलग पाच वेळा सर करून आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवदुर्ग गड किल्ले शंभर पेक्षाही अधिक वेळा चढाई करणारे असे ध्येयवादी रत्न औरंगाबादकरांना मिळणे ही बाब आपल्या साठी निश्चितच अभिमानास्पद आहे.

महाराष्ट्राची बुलंद तोफ...
आपल्या सर्वांचे आदरणीय, वंदनीय प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक यांनी त्यांच्यातील चांगले गुण ओळखत औरंगाबाद मधील अपंग बांधवांच्या मदतीसाठी त्यांना पक्षाचे महत्त्वपूर्ण स्थान देऊन समस्त औरंगाबाद मधील अपंगांसाठी एक नवी उमेद उभी केली. तेव्हापासून आजतागायत जिल्हाभरातील कोणत्याही अपंग व्यक्तीचा फोन आला तर तातडीने त्यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांच्या तक्रारीचे निवारणासाठी कायम तत्पर असतात. एक प्रेमळ मनमिळाऊ आणि विरोधकासमोर कणखर असा त्यांचा स्वभाव सर्वांनाच माहीत आहे. मोर्चे असो किंवा आंदोलने त्यामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्या अधिकार्‍यांना घाम फोडल्या शिवाय राहत नाहीत.

औरंगाबादकरांना असा परखड, चाणाक्ष, अभ्यासू जिल्हाध्यक्ष मिळाल्याने अपंगांना त्यांच्या संपर्कातील शासकीय कामे कधीच अडकून पडले नाही. कोणत्याही परिस्थितीत अपंगांची समस्या सोडवणारच... यामुळे त्यांचा जिल्हाभरातून वाढता जनसंपर्क असल्याने ते खुपच प्रसिद्ध असे व्यक्तीमत्व आहे. कारण अशा गरीब अपंग लोकांसाठी वेळ आल्यावर स्वतःच्या जीवाची सुध्दा पर्वा करत नाही. याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनाही आली होती. ज्यावेळेस औरंगाबाद मधील घाटी रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य राखीव दलाच्या शिपायासोबत वाद झाला होता. असा इतरांसाठी रक्त सांडणारा माणूस क्वचितच बघायला मिळतो. त्यांच्या बाबतीत कितीही लिहिले तरी कमी पडेल एवढी त्यांची महती आहे.

अशा त्यांच्या या महान कार्याची दखल घेत वंदनीय बच्चु भाऊ कडू यांनी दि. ०२ सप्टेंबर २०१७ रोजी शेगाव येथील अपंग राज्यस्तरीय मेळाव्यात माननीय शिवाजी भाऊ गाडे यांचा प्रहार जनशक्ती पक्षातील सर्वोत्तम समजला जाणारा व संपुर्ण महाराष्ट्रातून एकच निवडला जाणारा सक्षम जिल्हाध्यक्ष पुरस्कार वंदनीय बच्चु भाऊ कडू यांच्या हस्ते प्रदाण करण्यात आला होता.

त्यामुळे माझ्या मते तरी प्रहार संघटना आणि इतर राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गाडे साहेब आहेत. प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करण्याची व त्याची छाप मनाच्या अंतर्पटलावर उमटवण्याची अंगभूत कला असणारे म्हणूनच सक्षम जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ गाडे यांचा नामोल्लेख आज जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या पातळीवरील राजकीय पटलावर होतो. अगदी छोटा मोठा मोर्चा, आंदोलन, सोहळा देखील समाजसुधारणेच्या क्रांतीकारी विचारावर आणि बच्चू भाऊ कडू यांच्या विचार आणि आचारावर आधारित करून त्यात सहभागी कार्यकर्त्यांना प्रेरणा देत असतात. म्हणूनच तरुण पिढीला ते प्रेरणादायी ठरतात. विरोधकांनाही त्यांच्या या जगण्याबद्दलचा नि:संदीग्ध विश्वास असणे यातच त्यांचे वेगळेपण दडले आहे. काही व्यक्तींची वैचारिक जडणघडणच इतकी पारदर्शी असते की त्यांच्या निवेदनाचा विरोध करतांना पातळी सोडण्याचे धाडस शासकीय अधिकारी व राजकीय विरोधकांनाही होत नाही. आचरणाचा आव असाच असतो. जगण्याचे मापदंड जेवढे कठोर, सार्वजनिक प्रभाव तेवढा गहीरा. हे राजकीय आत्मभान कमवावे लागते. भुमिकांची धरसोड करणाऱ्यांच्या वाट्याला हा मराबत कधी येत नाही. जगाने पसंती द्यावी अशी पदाची उंची गाठण्याची महत्वकांक्षा अश्या व्यक्तीमत्वांना कधीही नसते.

या वाढदिवसाच्या क्षणी शिवाजी गाडे साहेबांना पुनश्च एकदा लाख लाख शुभेच्छा!!

आप्पासाहेब एन. तुपे

Comments

Popular posts from this blog

दिनदुबळ्यांचा मसिहा…..!

बच्चु भाऊ यांच्या कडून मिळालेला सन्मान